24 वर्षांची गौरवशाली परंपरा अनुभवण्याची संधी; मानवी मनोऱ्यांचा थरार अन् लाखोंच्या बक्षिसांची लयलूट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागच्या सांस्कृतिक आणि उत्सवी परंपरेचा अविभाज्य भाग बनलेला दहीहंडीचा जल्लोष यंदाही मोठ्या दिमाखात रंगणार आहे. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून 24 वर्षांची गौरवशाली परंपरा पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उत्सवाची तयारी सध्या जोमाने सुरू असून, मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी अलिबागकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्येही दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवता येणार आहे. यंदा शनिवारी, 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून अलिबागमधील शेतकरी भवनसमोर हा उत्सव रंगणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे, नागरिकांना सांस्कृतिक जल्लोषाचा आनंद घेता यावा आणि गोविंदा पथकांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून 24 वर्षांपूर्वी या उत्सवाला सुरुवात झाली. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात उत्सवाचे वाढते स्वरूप, आकर्षक उपक्रम आणि गोविंदा पथकांचा थरार यामुळे अलिबागच्या दहीहंडीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यंदाही शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात येणार असून, शंभरहून अधिक सदस्यांचा त्यामध्ये सहभाग राहणार आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
गोविंदा पथकांच्या सुरक्षेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. डॉक्टरांसह रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात येणार आहे. उत्सव आनंदमय, सुरक्षित आणि शांततामय वातावरणात पार पडावा, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना अटी व शर्तींची माहिती देण्यात आली असून, विविध समित्यांवर जबाबदारी सोपवून ती खंबीरपणे पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, अलिबागकरांना यंदाही घरबसल्या दहीहंडीचा थरार अनुभवता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्सवाचे थेट क्षण घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अलिबागच्या मानाच्या दहीहंडीचा हा 24 वर्षांचा सांस्कृतिक वारसा पुढे नेताना यंदाचा उत्सव अधिक उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग आणि प्रशांत नाईक मित्रमंडळाने कंबर कसली आहे.
लाखोंच्या बक्षिसांची बरसात!
दहीहंडी स्पर्धेसाठी गोविंदा पथकांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, यंदा विजेत्या पथकांवर लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. पुरुष गोविंदा अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकासाठी 2 लाख 51 हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला 5 हजार रुपये, तर सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकाला 11 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर,
महिला गोविंदा अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकासाठी 1 लाख 1 हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. चार थरांची सलामी देणाऱ्या महिला पथकाला 5 हजार रुपये, तर पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला 11 हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.
रिल्स स्पर्धांचे ठरणार आकर्षण
दहीहंडी उत्सवानिमित्त अलिबाग तालुका मर्यादीत रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मानवी मनोऱ्यासह वेगवेगळ्या प्रकारचे दहीहंडी उत्सवाची रिल्स तयार करणाऱ्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यांना अकरा हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला रोख सात हजार रुपये सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे या उत्सवामध्ये रिल्स स्पर्धांचे एक वेगळे आकर्षण ठरणार आहे.







