। पनवेल । प्रतिनिधी ।
सायन-पनवेल महामार्गावरील हिरानंदानीसमोरील पुलावर बुधवारी (दि. 2) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. दुभाजकाला धडकून टेम्पो आडवा झाल्याने केबिनचा चुराडा झाला. या केबिनमध्ये चालक अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाच्या खारघर केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करून चालकाची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो मुंबई-पुणे लेनवरून जात असताना पुलावर दुभाजकाला धडकला. धडकेनंतर टेम्पो आडवा झाला आणि केबिनचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात चेपला गेला. त्यामुळे चालक अस्लम खान हे केबिनमध्ये अडकले होते. घटनेची माहिती मिळताच खारघर अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. जवानांनी स्प्रेडर उपकरणाच्या सहाय्याने वाहनाचा दरवाजा उघडून चालकाचा एक पाय मोकळा केला. त्यानंतर हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने डॅमेज झालेले स्टेअरिंग आणि केबिनचा भाग बाजूला करण्यात आला. या प्रयत्नांनंतर चालकाला सुरक्षितपणे केबिनबाहेर काढण्यात जवानांना यश आले. या अपघातात चालक अस्लम खान यांच्या दोन्ही पायांना तसेच तोंडाला दुखापत झाली आहे. सुटका केल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी खारघर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते. या बचावकार्यात अग्निशमन प्रणेता दरेकर, फायरमन जी. आर. तांडेल, जे. वाय. कोळी, के. वाय. पाटील, ए. एस. वाघ, एन. आर. पाटील तसेच यंत्रचालक डी. डी. पाटील यांनी सहभाग घेतला.






