डेंग्यू व लेप्टोस्पायरोसिसने रुग्ण दगावले; आरोग्य विभाग अनभिज्ञ
| उरण | प्रतिनिधी |
मागील काही दिवसांपासून पावसाने अंशतः उघडीप घेतली असली तरी ऐन श्रावणात सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींमध्ये भर घालणारा आहे. रिमझिम पावसामुळे हवेत काही अंशी गारवा असताना अनेकांना डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप यासह उलट्या, जुलाब असा त्रास होत असतानाच मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांत दुपटीने वाढ होत आहे. मागील महिनाभरात डेंग्यूचे 101 रुग्ण आढळून आले असून, डेंग्यू व लेप्टोस्पायरोसिसने रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत असतानाच आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उरण परिसरात जुलै, ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला असून, परिसरात पूरसदृश्य परिस्थिती होती. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आणि ऊन पडण्यास सुरुवात झाली. मात्र, या काळात ठिकठिकाणी पावसाचे साचलेले डबके, घराच्या आवारात साचलेल्या सामानामध्ये जमा झालेले पाणी यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील अनेक गोदामे, टायर पंक्चर बरोबर भंगारची दुकाने ही डासांची उत्पत्तीची ठिकाणे बनली आहेत.एकंदरीत दूषित पाणी, अस्वच्छता,बदलते वातावरण आणि वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, मळमळ, कावीळ असा त्रास सुरू असताना मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांत दुपटीने वाढ होत असून, दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन व आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे उरण शहर, चाणजे, जासई, कोप्रोली, चिरनेर, कळंबुसरे, विंधणे, करळ, सोनारी, चिर्ले, आवरे, वशेणी, बांधपाडा, पिरकोण, सारडे, नवघर, वेश्वीसह इतर गावांमध्ये तसेच बेलपाडा गावात मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.
आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईकांमध्ये असणारी अपुरी माहिती यामुळे तालुक्यात डेंग्यू व लेप्टोस्पायरोसिसने रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, तालुक्यात मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांत दुपटीने वाढ होत असताना आरोग्य विभाग व प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले हे उरण तालुक्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्येकडे व स्धवच्छेच्या बाबतीत लक्ष केंद्रित करतील का, असा सवाल सध्या उरणकर विचारत आहेत.







