| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान विभागाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुधवार दि.2 रोजी आयोजित या स्पर्धेत इयत्ता नववी व दहावीतील कल्याणी बाणे, तपस्वी पाटील, पूनम राठोड, विभावरी मोरे, किंजल हामणे, महेश केंद्रे, जैविक म्हात्रे आणि वैष्णव मलेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मित्र साधन की धोका?’ या विषयावर आधारित प्रभावी नाट्यप्रयोग सादर केला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि दैनंदिन जीवनातील वाढता वापर, त्याचे फायदे तसेच संभाव्य धोके यांचे प्रभावी मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून केले. आशयपूर्ण संवाद, उत्कृष्ट अभिनय, प्रभावी सादरीकरण आणि सामाजिक संदेश यामुळे परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या यशामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, मुख्याध्यापक नीलेश मगर, शिक्षकवृंद आणि पालकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या दक्षता शेरमकर आणि निधी नाईक या शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले.






