पोकलनच्या ब्रेकरने डोक्यात प्रहार; विजय थळे यांचा जागीच मृत्यू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मापगाव परिसरात खाणीतील दगड-मातीच्या कथित विनापरवाना खोदकामावरून पेटलेल्या वादाने बुधवारी सायंकाळी थरारक वळण घेतले. खोदकामाला विरोध करणाऱ्या 50 वर्षीय विजय थळे यांच्या डोक्यावर पोकलनच्या ब्रेकरने जोरदार प्रहार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या थळे यांचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. हत्येनंतर पसार झालेल्या निकेश दळवी आणि आशिष दळवी या दोघांना अलिबाग पोलिसांनी अवघ्या काही तासांत बहिरोळे येथून ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार, दि. 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील मापगाव परिसरातील टाकादेवी मंदिराजवळील विजया लक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या खाणीत माती व दगडाचे खोदकाम सुरू होते. बहिरोळे येथील निकेश दळवी व आशिष दळवी यांना या खोदकामाबाबत विजय थळे यांनी सुमारे आठ दिवसांपूर्वी जाब विचारला होता. विनापरवानगी दगड-मातीचे खोदकाम करून त्याची विक्री करू नये, असे त्यांनी सांगितले होते. यावेळी थळे आणि दळवी यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. याच वादातून शिवीगाळ व धमकी देण्यात आल्याचेही समोर आले आहे.
बुधवारी सायंकाळी निकेश आणि आशिष हे दोघे पोकलनच्या सहाय्याने खाणीत दगड फोडण्याचे काम करीत होते. विजय थळे तेथे गेले असता पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पोकलनच्या ब्रेकरने विजय थळे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, विजय थळे यांच्यासोबत असलेल्या शांताराम नामक व्यक्तीलाही मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन पोलीस अधिकारी आणि पाच अंमलदारांचे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. सायबर विभागाचीही मदत घेण्यात आली. पेझारी नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांचा दबाव वाढताच आरोपी तेथून परत फिरले. अखेर बहिरोळे येथे त्यांच्या घराजवळ पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत कदम करीत आहेत.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
विजय थळे यांच्या डोक्यावर पोकलनच्या ब्रेकरने प्रहार केल्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले. घटनेनंतर अलिबाग पोलिसांनी तातडीने दोन अधिकारी व पाच अंमलदारांचे पथक तयार केले. सायबर विभागाच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. पेझारी नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र, आरोपी तेथून परत फिरले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवत अखेर बहिरोळे येथे घराजवळच दोघांना ताब्यात घेतले.
आठ दिवसांपूर्वीच झाला होता वाद
‘दगड-मातीचे खोदकाम बंद करा’ म्हणताच वादाची ठिणगी खाणीत सुरू असलेल्या दगड-मातीच्या खोदकामाबाबत विजय थळे यांनी आठ दिवसांपूर्वी निकेश व आशिष दळवी यांना जाब विचारला होता. विनापरवाना खोदकाम करून दगड-मातीची विक्री करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी खाणीत सामना झाल्यानंतर वादाचा थेट हत्येतच रूपांतर झाल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे.







