पनवेलच्या लाईन आळीत ‘नाथभक्ती’आणि संस्कृतीचा अनोखा संगम
| कळंबोली | प्रतिनिधी |
गगनचुंबी मानवी मनोरे, डीजेंचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि लाखो रुपयांची बक्षिसे अशा आधुनिक चकचकाटापासून दूर राहत, जुन्या पनवेलमधील ऐतिहासिक लाईन आळी आणि टपाल नाका परिसरात शेकडो वर्षांची परंपरा असणारा पारंपारिक दहीहंडी उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
पनवेलमधील या दहीहंडीला 300 हून अधिक वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे थरावर थर लावून व्यावसायिक गोविंदा पथकांकडून हंडी फोडली जात नाही. तर, नवनाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार, बापट वाडा आणि लाईन आळी परिसरातील स्थानिक भाविक, विठोबा-रखुमाईचे उपासक आणि नवनाथ भक्त श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन हा सोहळा साजरा करतात. या पारंपरिक उत्सवात भाविक विविध देव-देवतांचे आणि नाथांचे पारंपरिक मुखवटे परिधान करतात. ॐ नमः आदेश आणि गोविंदा गोपाळाच्या जयघोषाने संपूर्ण लाईन आळी परिसर दुमदुमून निघतो. कोणत्याही पैशांच्या किंवा मानाच्या बक्षिसांशिवाय, अत्यंत पवित्र वातावरणात एका चांदीच्या काठीने म्हणजेच राजदंडाने ही पारंपरिक दहीहंडी फोडली जाते. आमची दहीहंडी हा केवळ एक सण नसून तो पनवेलच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि अखंड परंपरेचा ठेवा आहे. आजच्या काळात जिथे दहीहंडीला व्यावसायिक स्वरूप आले आहे, तिथे लाईन आळीतील ही हंडी आजही पूर्वजांनी सुरू ठेवलेली शुद्ध भक्ती आणि साधेपणा टिकवून आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.






