| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील (नैना) नगररचना प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सिडकोने नगररचना योजना क्रमांक 2 अंतर्गत सहा गावांच्या अंतिम सुनावणीसंदर्भातील माहिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत केली आहे. सिडकोच्या संकेतस्थळावरील नोंदीनुसार ही माहिती दि.4 सप्टेंबर रोजी अद्ययावत करण्यात आली आहे.
टीपीएस-02 अंतर्गत बेलावली, देवद , सांगडे, चिपळे, भोकरपाडा आणि विहीघर या सहा गावांचा समावेश आहे. या प्रत्येक गावासाठी अंतिम सुनावणीच्या तारखांची स्वतंत्र माहिती सिडकोने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे संबंधित गावांमधील जमीनमालक आणि इतर हितधारकांचे या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. सिडकोच्या नैना विभागातील अधिकृत माहितीनुसार, टीपीएस 02 प्रक्रियेमध्ये प्रारूप नगररचना योजना, लवादाची नियुक्ती, लवाद प्रक्रियेतील सुनावणी, प्राथमिक नगररचना योजना आणि त्यानंतर अंतिम नगररचना योजनेपर्यंतचे विविध टप्पे समाविष्ट आहेत. सिडकोने टी पी एस -02 ची मंजूर अंतिम योजनादेखील स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिली आहे. नैना क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने नगररचना योजना महत्त्वाच्या मानल्या जातात. या प्रक्रियेमध्ये संबंधित क्षेत्रातील जमिनींचे नियोजन, रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि विकासासाठी आवश्यक आरक्षणे यांसारख्या बाबींचा विचार केला जातो. त्यामुळे नगररचना योजनेच्या पुढील टप्प्यांकडे संबंधित जमीनमालकांचे विशेष लक्ष असते. दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल आणि आसपासच्या नैना क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोकडून नगररचना योजनांशी संबंधित माहिती सातत्याने अद्ययावत होत असल्याने आगामी काळात या भागातील विकासाला कोणती दिशा मिळते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष राहणार आहे.







