| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य बाजारपेठेत अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या तसेच आस्थापना लगतचे बेकायदेशीर शेड व पायऱ्यांवर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला, तरी या कारवाईमुळे आता बाधित व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “केवळ लहान व्यावसायिकांवरच कारवाई का?” असा प्रश्न उपस्थित करत बाधितांनी आता प्रशासनाकडे एकमुखी मागणी लावून धरली आहे.
श्रीवर्धन नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून शहरातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. याठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या तसेच आस्थापना लगतचे बेकायदेशीर शेडवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, या कारवाईमुळे बाधित व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शहरातील मोठ्या टोलेजंग इमारतींनी नगरपरिषदेची बांधकाम परवानगी, विकास नियंत्रण नियमावलीचे नकाशे मंजूर न करता किंवा वापर परवाना न घेता बेकायदेशीर बांधकामे केली आहेत, त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्यात यावी. याशिवाय, श्रीवर्धन समुद्रकिनारा परिसरात सीआरझेड नियमांचे सर्रास उल्लंघन करून उभारण्यात येणाऱ्या रिसॉर्ट्सवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या रिसॉर्ट चालकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नोंदणी, पर्यावरण विभागाची मंजुरी तसेच अग्निशामक दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र न घेताच अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. त्यामुळे “नियम आणि कायदा सर्वांसाठी समान असावा. जर छोट्या टपऱ्या आणि शेडवर त्वरित कारवाई होते, तर सीझेडसीआरचे नियम तुडवणारे बडे रिसॉर्ट व्यावसायिक आणि परवानग्या नसलेल्या मोठ्या इमारतींवर प्रशासन कधी कारवाई करणार?” असा प्रश्न बाधित व्यावसायिकांनी विचारला आहे. आता नगरपरिषद व पोलीस प्रशासन या बेकायदेशीर हॉटेल आणि इमारतींवर मोहीम उघडणार का, याकडे संपूर्ण श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे.






