समायोजनासाठी आलेल्या 351 शिक्षकांची गैरसोय; प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी
। रायगड | जिल्हा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षकांचे समुपदेशन व समायोजन बुधवारी (दि. 9) कुंठेबाग येथील जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सुमारे 351 शिक्षकांना मात्र प्रशासनाच्या नियोजनाअभावी रस्त्यावर बसण्याची वेळ आली. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शिक्षकांच्या सोयी, शाळांमधील अंतर आणि उपलब्ध रिक्त जागांचा ताळमेळ साधण्यासाठी हे समायोजन करण्यात येत होते. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेसाठी शिक्षक सकाळपासूनच कुंठेबाग येथे दाखल झाले होते. सकाळी नऊ वाजता प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना संबंधित अधिकारी व पदाधिकारी उशिरा दाखल झाल्याने समायोजनाची प्रक्रिया सुमारे दोन तास उशिराने सुरू झाली. सुरुवातीला अवघड क्षेत्रातील शाळांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर दक्षिण रायगडमधील शाळांमध्ये शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, सकाळपासून आलेल्या शिक्षकांसाठी प्रशासनाकडून बसण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे काही शिक्षकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला, तर काहींनी थेट रस्त्यावर बसून आपली वेळ येण्याची प्रतीक्षा केली. काही शिक्षक अध्यक्षांच्या बंगल्याजवळील शेडमध्ये बसले होते.
एकीकडे आदर्श शिक्षकांचा सत्कार करून शिक्षण विभाग स्वतःची पाठ थोपटून घेतो; तर दुसरीकडे त्याच शिक्षकांना रस्त्यावर बसण्याची वेळ येते, हा विरोधाभास संतापजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिक्षकांसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांसाठी किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यातही प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढल्याने शिक्षकांची गैरसोय आणखी वाढली. समायोजनासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य नियोजन करणे अपेक्षित असताना शिक्षकांना रस्त्यावर बसण्याची वेळ येणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकाराबाबत शिक्षणाधिकारी नाईकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.






