मिडीयाचा आधार घेत वांग्याची लागवड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पांढरा कांदा उत्पादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील सतिश म्हात्रे या शेतकऱ्याने भर पावसाळ्यात अनोखा शेती प्रयोग केला आहे. त्यांनी यूट्यूब मिडीयाच्या मदतीने पाण्याच्या पारदर्शक जारमध्ये वांग्याची लागवड केली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांचा हा अनोखा प्रयोग यशस्वी झाल्याचे सतिश म्हात्रे यांनी सांगितले.
बदलते हवामान, शासनाच्या जाचक अटी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यांच्या सल्ल्यानुसार शेतीची लागवड अनेक जण करतात. मात्र, अनेकवेळा शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नसल्याचे बोलले जाते. मात्र, अलिबागमधील कार्ले येथील सतिश म्हात्रे या शेतकऱ्याने मोबाईलच्या सहाय्याने आणि युट्यूब मिडीयाच्या मदतीने भातशेती व्यतिरिक्त अन्य पिकांची लागवड करून एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी युट्यूब मिडीयावरून लागवड व फवारणी विषयक माहिती संकलीत केली आणि हा प्रयोग त्यांच्या शेतामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी वांग्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जूनच्या पहिल्या आठवड्यात तीन गुंठे क्षेत्रामध्ये वांग्याची लागवड केली. ही लागवड पाण्याच्या पारदर्शक जारमध्ये करून एक अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वीदेखील ठरला. यामध्ये सतिश म्हात्रे यांना त्यांच्या पत्नीची साथ मोलाची ठरली. पांढरा कांदा उत्पादक शेतकरी म्हणून ओळख असलेले सतिश म्हात्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून भातशेतीसह इतर पिकांची लागवड करीत आहेत. त्यांनी चवळी, भेंडी, पडवळ, दुधी अशा अनेक भाजीपाला पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे. एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख असून, एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून आतापर्यंत त्यांनी वीसहून अधिक पुरस्कार देखील मिळविले आहेत.
आता वांग्याची रोपे मोठी झाली असून, त्या रोपांना वांगी आली आहेत. ही वांगी बाजारात विक्रीसाठीदेखील पाठविण्यास सुरुवात केली आहे. अलिबागसह आजूबाजूच्या स्थानिक बाजारात आतापर्यंत दीडशेहून अधिक किलो वांगी विकली गेली असून, या वांगीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यासह युट्यूब मिडीयाच्या मदतीने चांगल्या उत्पादनाच्या पिकांची लागवड करता येते.
सतिश म्हात्रे,
शेतकरी, कार्ले






