नाल्यात मृतदेह पुरून ठेवल्याचा प्रकार; काही संशयित पोलिसांच्या ताब्यात
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलजवळील गव्हाण फाटा येथे एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह परिसरातील नाल्यात पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पनवेल शहर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
गव्हाण फाटा येथील वाहतूक पोलीस चौकीजवळ एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात पुरून ठेवल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच परिमंडळ-3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक नासिर पटेल तसेच गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून नाल्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसराची कसून पाहणी तसेच चौकशी सुरू केली असून, या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. महिलेची ओळख तसेच हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या घटनेमागील कारण आणि हत्येतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू आहे.





