दहावीची 15, तर बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील लाखो दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारी ते गुरुवार, 11 मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. त्यामुळे यंदाची परीक्षा पाच दिवस आधी सुरू होणार आहे.
दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीपासूनच विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला अंतिम स्वरूप येणार आहे.
बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. तर बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.





