पालिकेच्या नोंदीत गाळ काढल्याचा दावा; तलावाभोवती मात्र अजूनही गाळाचा खच
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या शार्लोट लेकमधून तब्बल एक हजार ट्रक गाळ काढल्याची नोंद पालिकेच्या बांधकाम विभागात आहे. मात्र, हा गाळ नेमका गेला कुठे, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. विशेष म्हणजे, तलावाच्या भोवती आजही मोठ्या प्रमाणात मातीमिश्रित गाळ साचलेला असल्याने एक हजार ट्रक गाळ काढल्याची नोंदच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यामुळे तत्कालीन नगर अभियंत्यांनी केलेल्या नोंदीची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
शार्लोट लेकच्या गाळ काढण्यासाठी अमृत 2.0 योजनेतून सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तलावातील गाळ काढून तो शहरातील रस्त्यांसाठी वापरण्याचे नियोजन होते. त्यानुसार 1 हजार ट्रक गाळ काढल्याचा अहवाल तत्कालीन नगर अभियंत्यांनी पालिकेकडे देयकासाठी सादर केला. मात्र, सर्वसाधारण सभेत कामावर आक्षेप घेतल्याने देयक अदा करण्यात आले नाही. गाळ काढला असेल तर तो कुठे साठवला? त्याची वाहतूक कुठे झाली? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी केला आहे. तत्कालीन नगर अभियंत्यांच्या नोंदी, प्रत्यक्ष काम आणि गाळाच्या विल्हेवाटीची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी शार्लोट लेक खरोखर गाळमुक्त झाला आहे का, संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे का, हे पालिकेने जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
गाळाचा हिशेब द्या!
कागदावर एक हजार ट्रक गाळ; प्रत्यक्षात तलावाभोवती गाळच गाळ! गाळ काढला असेल तर त्याचे ठिकाण, वाहतूक आणि विल्हेवाट याचा संपूर्ण हिशेब पालिकेने नागरिकांसमोर मांडावा, अशी मागणी होत आहे.
एक हजार ट्रक गाळ काढल्याची नोंद आहे; मात्र तो गाळ कुठे गेला याचा स्पष्ट तपशील नाही. तलावाभोवती आजही गाळ दिसत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची शासनाने चौकशी करावी.
राकेश कोकळे,
स्थानिक कार्यकर्ते






