| रायगड | जिल्हा प्रतिनिधी|
राज्य विधी मंडळाची महत्वाची असलेली अंदाज समिती तीन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. शासकीय विकास कामांचा व खर्चाचा आढावा या समितीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील रखडलेला अलिबाग-रोहा मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनासह पोलीस पाटील यांच्या मानधनातील अपहार, जिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीवर झालेला करोडोचा खर्च आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या असलेल्या दुरवस्थेबाबत ही समिती काय भूमिका घेणार याकडे आता रायगडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचे 27 सदस्य रायगड जिल्ह्यात येणार आहेत. त्यामध्ये विधान परिषद व विधानसभेचे आमदार, तसेच अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती 29ते 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या कालावधीत रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या विभागाची पाहणी करणार आहेत. या समितीमध्ये आमदारांसह अधिकारी असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून वेगवेगळ्या विभागाची धावाधाव सुरु झाली आहे. जिल्हास्तरावर वेगवेगळ्या बैठका घेऊन सर्व फाईल तयार करून ठेवण्याचे आदेश जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या विभागाला देण्यात आले आहेत. क्रीडा विभागाकडून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेतून अनुदान सर्वसाधारण अंतर्गत साहित्यांसाठी वितरीत केलेला निधी, विनियोग झाला किंवा नाही, याची पाहणी समितीद्वारे केली जाणार आहे.
क्रीडांगण विकास, व्यायामशाळा विकास, अनुदानातून तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेला निधी याबाबतही माहिती घेतली जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेसह महसूल विभाग व अशा अनेक विभागाच्या खर्चाचा व कामांचा आढावा घेतला जाणार आहे. ही समिती खर्चाचा आणि कामांचा आढावा घेऊन काय कार्यवाही करणार याकडे आता रायगडकारांचे लक्ष लागून राहिले आहे.






