रायवाडीकरांनी जपली 15 वर्षांची परंपरा; शिस्तबद्ध नियोजनाची सर्वत्र चर्चा
| अलिबाग | संतोष राऊळ |
अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टीला साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव रायगड जिल्ह्यात विशेषतः पेणसह अलिबाग, उरण पनवेल आणि कर्जत या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील रायवाडी गावात श्री गणेश मित्र मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहाने साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बुधवार दि.30 सप्टेंबर रोजी ‘रायवाडीचा राजा’ला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदा या गणेशोत्सवाचे 15 वर्ष असून, आजही या मंडळाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
रायवाडी गावात गेल्या 15 वर्षांपासून श्री गणेश मित्र मंडळातर्फे साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंडळाची स्थापना 2012 साली काही मोजक्या तरूणांनी केली. या मंडळाचे पहिले वर्ष खडतर होते. त्यावेळी ज्या युवकांनी साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यातील बहुतांश तरूण हे शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. वेळही कमी असल्यामुळे मिळालेल्या तुटपूंज्या लोकवर्गणितून हा उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर मंडळातील युवकांच्या परिश्रमातून यंदा 15 व्या वर्षी या साखरचौथ गणेशोत्सवाला भव्य रूप आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही मंगळवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी गणरायांचे थाटात आगमन करण्यात आले. त्यांनतर विधिवत पुजा संपन्न झाल्यावर परिसरासह अलिबाग तालुक्यातील गणेश भक्तांनी ‘रायवाडीचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास परिसरातील भजन मंडळींच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यानंतर रात्री बाप्पाची आरती पार पडली. या आरतीचीही सर्वत्र चर्चा आहे. ही आरती जवळजवळ एक तास चालते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत महिला व लहानमुलांसाळी विविध खेळांचे आयाजेन करण्यात आले होते. या खेळांमध्ये परिसरातील महिला व लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच, विजेत्यांना बक्षिस देखील देण्यात आले. त्यामुळे सर्वांमध्ये कौतुकाचे वातावरण होते. यादरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील ‘रायवाडीचा राजा’चे दर्शन घेतले. तसेच, मंडळातर्फे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दि.30 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ‘रायावाडीचा राजा’ची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत अलिबाग तालुक्यातील परहुरपाडा येथील विघ्नहर्ता बिट्स बँजो पथक विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या तालावर परिसरातील भक्तांसह मंडळातील कार्यकर्ते थिरकले. यावेळी विशेषतः महिला वर्गामध्ये मोठा उत्साह दिसून आला. दुपारच्या सुमारास काढलेली ही विसर्जन मिरवणूक रात्री उशीरा नागाव येथील भिमेश्वर तलावाजवळ पोहोचली. त्यानंतर ‘रायवाडीचा राजा’ची मनोभावे आरती करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरम्यान, मिरवणूक निघाल्यापासून ते बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. साखरचौथच्या पहिल्या गणेशोत्सवापासून ते 15 व्या उत्सवापर्यंत रायवाडीतील श्री गणेश मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध नियोजनाची परंपरा कायम राखली आहे. तसेच, बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जनही योग्य पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या या नियोजनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.







