| खांदेश्वर | प्रतिनिधी |
गौरा गणपती उत्सवानिमित्त नवीन पनवेलमधील पोदी परिसरातील सिद्धिविनायक मंडळाने यंदा भक्तीबरोबरच वाचन संस्कृतीचा संदेश देणारा अनोखा देखावा साकारला. महाराष्ट्रातील ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलारच्या धर्तीवर मंडळाने पुस्तकांचा देखावा उभारला असून, हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा वाढता वापर यामुळे विशेषतः मुलांमध्ये वाचनाची सवय कमी होत असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंडळाने गणरायाच्या हातात पुस्तक देत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. देखाव्यामध्ये इतिहास, समाजसुधारक, थोर विचारवंत, महापुरुष तसेच विविध ज्ञानवर्धक विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाला भेट देणाऱ्या नागरिकांना या पुस्तकांचा परिचय करून घेता येत असून, काही नागरिकांनी स्वतःहून मंडळाला पुस्तके भेट देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तीन ते चार पुस्तके नागरिकांनी विनामूल्य दिली असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
‘वाचाल तर वाचाल’
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक आणि शैक्षणिक संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची विचार करण्याची क्षमता वाढावी आणि ज्ञानाची गोडी लागावी, हा मंडळाचा प्रयत्न आहे. ‘वाचाल तर वाचाल’ या संदेशातून प्रत्येकाने दररोज काही वेळ वाचनासाठी द्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गौरा गणपती उत्सवाच्या माध्यमातून ज्ञान आणि भक्तीचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.





