। महाड | प्रतिनिधी ।
किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवत असल्याचा संदेश पत्नीला व्हॉट्सॲपवर पाठवून बेपत्ता झालेल्या 37 वर्षीय तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी येथील सुयोग सुरेश पांचाळ सध्या रा. रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग पांचाळ शनिवारी (दि.3) पहाटे किल्ले रायगडावर आला होता. त्याने आपली आर्टिगा कार किल्ल्याच्या पायथ्याशी उभी केली आणि पायरी मार्गाने गडावर गेला. सकाळी साडेसातच्या सुमारास तो टकमक टोकावर पोहोचला. यावेळी त्याने पत्नीला व्हॉट्सॲपवर टकमक टोकाचे फोटो पाठविले. त्यानंतर त्याने जीवन संपविण्याबाबत संदेश पाठविल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. घटनेची माहिती मिळताच सुयोगचा भाऊ सुवेल पांचाळ याने रायगड किल्ल्यावर धाव घेतली. टकमक टोकासह परिसरात त्याचा शोध घेण्यात आला; मात्र सुयोगचा ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी सायंकाळी महाड तालुका पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी गड परिसरात शोधमोहीम राबवली असता किल्ल्याच्या पायथ्याशी सुयोगची आर्टिगा कार आढळून आली. रात्र झाल्याने शनिवारी शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळपासून महाड तालुका पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी ड्रोनच्या सहाय्याने दरीत शोध घेत असताना एका ठिकाणी मृतदेह दिसून आला. मृतदेह दरीतील नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे, याची पाहणी करून तो सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित नेवसे घटनास्थळी उपस्थित असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







