रानसई धरणाच्या पाणीपातळीत होतेय घट
| उरण | प्रतिनिधी |
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने उरण तालुक्याची तहान भागविणाऱ्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. सध्या धरणाची पाणीपातळी 114.6 फुटांवर आली असून, येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर नोव्हेंबरपासून उरण तालुक्यात पाणीकपात लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उरण नगरपरिषदेसह तालुक्यातील 21 ग्रामपंचायती, एनएडी, ओएनजीसी तसेच विविध औद्योगिक प्रकल्पांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.
उरण तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपरिषद क्षेत्रासह विविध ग्रामपंचायती आणि औद्योगिक आस्थापनांचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात रानसई धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी आणखी खालावल्यास घरगुती पाणीपुरवठ्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने 11 डिसेंबरनंतर पाणीकपात लागू करण्यात आली होती. यंदा मात्र पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे राहिलेले नसल्याने पाणीकपातीची वेळ महिनाभर आधीच येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील वर्षी परतीच्या पावसामुळे रानसई धरण तब्बल तीन वेळा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला होता. यंदा मात्र परतीचा पाऊस लांबल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये धरणाची पाणीपातळी 116.6 फुटांपर्यंत होती. यंदा ती 114.6 फुटांवर घसरली आहे. पाणलोट क्षेत्रात पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास पाणीपातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. रानसई धरणाची पातळी घटत असताना उरणमधील पारंपरिक जलस्रोतांचीही दुरवस्था होत असल्याचे चित्र आहे. शहर आणि परिसरातील काही पाण्याच्या विहिरी बुजविण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, तर काही विहिरींमधील पाणीसाठा वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असताना उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, उरण पंचायत समिती कार्यालयासमोर असलेल्या विहिरीत अद्याप पाणीसाठा उपलब्ध असल्याचे नागरिक सांगतात. मात्र हा जलस्रोत वापरात नसल्याने उपलब्ध पाणी तसेच पडून आहे. एकीकडे रानसई धरणाची पाणीपातळी घटत असताना आणि दुसरीकडे स्थानिक जलस्रोत आटत असताना उपलब्ध पाण्याचा वापर का केला जात नाही, असा सवाल उरणकरांकडून उपस्थित केला जात आहे. पंचायत समिती कार्यालयासमोरील विहिरीतील पाण्याचा उपयोग कोणत्या पद्धतीने करता येईल, याचा तातडीने आढावा घेऊन हा जलस्रोत वापरात आणावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रानसई धरणाबरोबरच तालुक्यातील विहिरी, तलाव, बंधारे आणि अन्य जलस्रोतांवरही पावसाअभावी ताण वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत असल्याने उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेती तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. रानसईच्या घटत्या पातळीबरोबरच स्थानिक जलस्रोतही संकटात सापडले असताना प्रशासनाने आता तरी जागे होण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाला तर परिस्थितीत सुधारणा होऊ शकते; मात्र पावसाने आणखी दडी मारली तर नोव्हेंबरपासून उरणकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे रानसई वाचविण्यासोबतच उरणमधील प्रत्येक उपलब्ध जलस्रोत वाचविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.






