वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली शहरातील हटाळेश्वर चौक ते गांधी चौक हा मुख्य मार्ग सध्या बेशिस्त पार्किंगच्या समस्येने त्रस्त झाला आहे. रस्त्याच्या कडेला तसेच बाजारपेठेतील विविध ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी वाहने उभी करू नयेत, असे फलक लावण्यात आलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
पाली बाजारपेठेत दररोज मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. आयडीसी बँकेसमोर, हटाळेश्वर चौक परिसर तसेच एकता पथ आणि खालच्या मोहोल्याकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने उपलब्ध रस्ता कमी होत आहे. परिणामी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहिल्याने मोठ्या वाहनांना मार्ग काढताना अडथळा निर्माण होतो. बाजारपेठेतील काही दुकानांसमोर वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांच्या ये-जा करण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच रस्त्याच्या हद्दीत पुढे आलेल्या दुकानांमुळे काही ठिकाणी रस्ता आणखी अरुंद झाला असून, वाहतुकीची कोंडी वाढत आहे. या समस्येबाबत पाली सुधागड संघर्ष समितीने अनेक वेळा आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने करण्यात आली आहेत. मात्र अद्याप या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पाली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था निश्चित करावी. तसेच बेशिस्त पार्किंगवर कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींवर नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी पाली सुधागड संघर्ष समितीसह नागरिकांकडून होत आहे. आता या गंभीर समस्येकडे पाली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर जेठे आणि पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे लक्ष देऊन ठोस कारवाई करतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






