| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा देत राज्य सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना तातडीने पदावरून हटविण्याची मागणी त्यांनी केली.
सरकारने दोन दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास एक लाखांहून अधिक विद्यार्थी पुण्याच्या रस्त्यावर उतरतील, असा इशारा पवार यांनी दिला. त्यानंतर पुणे बंद किंवा पुण्याहून थेट मुंबईतील मंत्रालयावर मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून पवार विद्यार्थ्यांसोबत उपस्थित आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी 7 किंवा 8 ऑक्टोबर रोजी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचेही पवार यांनी सांगितले.







