सराईत आरोपीला यूएईमधून अटक
| मुंबई | प्रतिनिधी |
लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 14 तरुणींचं लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करून परदेशात पसार झालेल्या एका सराईत आरोपीला संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात आणण्यात भारतीय तपास यंत्रणांना मोठं यश आलं आहे. महाराष्ट्र पोलिसांना हवा असलेला आरोपी मोहम्मद माजिन याचे 20 नोव्हेंबर रोजी भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आलं. केंद्रीय अन्वेषण विभाग, परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या समन्वयातून ही मोठी कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य पीडित तरुणीला आरोपी मोहम्मद माजिन याने लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करत तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, आरोपीने अशाच प्रकारे आणखी 13 महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे उघड झालं. या सर्व महिलांकडून त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले, इतकेच नव्हे तर आरोपीनं त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मोहम्मद माजिन हा कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी परदेशात पळून गेला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनंतर सीबीआयच्या इंटरपोल विभागाने त्याच्याविरोधात ’रेड नोटीस’ जारी केली होती. या नोटीसच्या आधारे यूएईच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच सक्षम न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले आहे.






