मृत कोंबडा, आठ नारळ, 15 लिंबू अन् पाच मडकी आढळली
| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा येथील स्मशानभूमीत मृत कोंबडा, आठ नारळ, 15 लिंबू, पाच मातीची मडकी, कापलेल्या दोन भाजीचे कोल्हे आणि लाल शेंदूर अशा विचित्र वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या वस्तू अघोरी विधी किंवा तोटक्यासाठी ठेवण्यात आल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने स्मशानभूमीतील या रहस्यमय प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.
शुक्रवारी कै. डी.के. जोशी यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि नागरिक मोहोपाडा स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी परिसरात या संशयास्पद वस्तू पडलेल्या दिसून आल्या. मृत कोंबड्यासह नारळ, लिंबू, मडकी आणि शेंदूर असा प्रकार पाहून उपस्थित नागरिकही चक्रावले.
स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा वस्तू कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवल्या, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अघोरी विधी किंवा तोटका केल्याचा संशय व्यक्त होत असला, तरी या प्रकाराला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, या प्रकाराची ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन स्मशानभूमीची पाहणी करावी आणि वस्तू ठेवणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्मशानभूमीतील या विचित्र वस्तूंचे गूढ उकलणार का, याकडे मोहोपाडावासियांचे लक्ष लागले आहे.






