डब्ल्यूपीएल,चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतींना मुकणार; प्रेक्षक गॅलरीची रचना बदलणार
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नेरुळमधील डी. वाय. पाटिल स्टेडियमचे नूतनीकरण सुरू असून, स्टेडियमशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे स्टेडियम पुढील 18 ते 20 महिने क्रीडा आणि इतर कार्यक्रमांसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता नाही. स्टेडियममधील प्रेक्षक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विविध भागांचे नूतनीकरण करण्यासाठी हे काम सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. स्टेडियमच्या विद्यमान प्रेक्षक गॅलरीची रचना बदलली किंवा नव्याने बांधली जाणार नसल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
या नूतनीकरणाचा भाग म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अतिरिक्त प्रसाधनगृहांची उभारणी केली जात आहे. यापूर्वी प्रसाधनगृहांची सुविधा प्रामुख्याने पहिल्या मजल्यावरच उपलब्ध होती. तसेच, प्रेक्षकांना एकाच मजल्यावर अन्नाची आणि प्रसाधनगृहाची सोय सहज उपलब्ध व्हावी यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजलवरील खाद्यक्षेत्रांचा विस्तार केला जात आहे. याशिवाय, आतिथ्य सुविधांसाठी अतिरिक्त जागा निर्माण करण्यासाठी पॅव्हेलियन भागाचेही नूतनीकरण केले जाणार आहे.
प्रेक्षकांना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी ही मूलभूत दुरुस्ती आणि नूतनीकरण केले जात आहे. प्रेक्षक क्षेत्राची विद्यमान रचना तशीच राहिल, मात्र पॅव्हेलियन भागात नव्याने काम केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. हे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण होण्यासाठी सुमारे 18 ते 20 महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून यादरम्यान स्टेडियममध्ये कोणत्याही क्रीडा किंवा इतर स्पर्धांचे आयोजन करता येणार नाही.
डी. वाय. पाटिल स्टेडियमवर यापूर्वी अनेक प्रमुख क्रिकेट, फुटबॉल स्पर्धा आणि संगीत मैफिली पार पडल्या आहेत. नूतनीकरणाचे काम चालेपर्यंत हे स्टेडियम काही काळ कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेतून बाहेर राहणार असल्याचे अधिकाऱ्याने पुष्टी दिली आहे. आगामी काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडर अत्यंत व्यस्त असणार असून, यादरम्यान आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा सुरुवातीला जून 2027 मध्ये होणार होती, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला आयसीसी बोर्डाने ती फेरबदल करत फेब्रुवारी 2027 मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
नवी मुंबईकरांची निराशा
6 जुलै 2026 रोजी जाहीर झालेली कटऑफ तारीख लक्षात घेऊन जगातील सर्वोत्तम सहा महिला टी-20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांचा समावेश असणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची निराशा झाली आहे.






