ई-पॉसच्या तांत्रिक बिघाडामुळे लाभार्थी त्रस्त; भरत पाटील यांची प्रशासनाकडे धाव
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून ई-पॉस मशीन आणि सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे रेशन वितरणात अडथळे निर्माण झाले आहेत. दुकानांमध्ये धान्य उपलब्ध असतानाही मशीनवर त्याची नोंद दिसत नसल्याने पात्र शिधापत्रिकाधारकांना हक्काचे धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांची गैरसोय होत असून, ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेते वेल्फेअर असोसिएशन, पनवेलचे अध्यक्ष भरत पाटील यांनी याप्रकरणी रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पनवेल तहसीलदारांना निवेदन दिले आहे. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य दिले जाते. मात्र, मशीनवर धान्याची उपलब्धता दिसत नसणे, सर्व्हर वारंवार बंद पडणे आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे वितरण प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, रेशन मिळेल या अपेक्षेने नागरिकांना दुकानांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. या परिस्थितीचा फटका दुकानदारांनाही बसत आहे. धान्य उपलब्ध असूनही तांत्रिक अडचणींमुळे वितरण करता येत नसल्याने दुकानदारांना लाभार्थ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. ई-पॉस मशीनवरील नोंदी तातडीने अद्ययावत कराव्यात, सर्व्हरमधील त्रुटी दूर कराव्यात आणि पनवेल तालुक्यातील रेशन वितरण पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी भरत पाटील यांनी केली आहे. तांत्रिक कारणांमुळे धान्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग आणि तहसील प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रेशन वितरण सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे.







