क्रीडा संकुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग जवळील नेहूली येथील क्रीडा संकुलाची दुरवस्था आधीच चर्चेचा विषय ठरत असताना, आता या संकुलातील धावपट्टीवर एका व्यक्तीने चारचाकी वाहन वेगाने फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेळाडूंना सरावासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची वानवा असतानाच धावपट्टीवर अशा प्रकारे वाहन चालवले जात असल्याने क्रीडा संकुलाच्या देखभालीचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेहूली क्रीडा संकुलातील धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून, संकुलाच्या दुरवस्थेमुळे खेळाडूंना सराव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने आपली चारचाकी गाडी थेट धावपट्टीवर आणून वेगाने फिरवल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. धावपट्टी ही धावपटू आणि इतर खेळाडूंच्या सरावासाठी असते. अशा ठिकाणी चारचाकी वाहन वेगाने फिरवणे धावपट्टीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब ठरू शकते. वाहनामुळे धावपट्टीचे नुकसान होण्याची शक्यता असून, त्याचवेळी खेळाडू सराव करत असतील तर त्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे क्रीडा संकुलात वाहनांना प्रवेश देण्याबाबत कोणते नियम आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकाराबाबत कृषीवलच्या प्रतिनिधींनी क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्याशी विचारणा केली असता, संबंधित घटनेची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याचे सांगत, तेथे सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंनी संबंधित व्यक्तीला अडवायला हवे होते, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, क्रीडा संकुलातील धावपट्टीवर एक व्यक्ती वाहन वेगाने फिरवत असेल, तर अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच, नेहूली क्रीडा संकुलाची दुरवस्था दूर करून खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच संकुलाच्या सुरक्षेकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, खेळाडूंच्या सरावासाठी उभारलेल्या क्रीडा सुविधांचा असा गैरवापर सुरूच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







