| कोलकाता | वृत्तसंस्था |
पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील चोरबागान येथील दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी आयोजक आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताच्या चोरबागान दुर्गा पूजा मंडपामध्ये शनिवारी (दि.17) रात्री गोंधळ उडाल्यामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली असून, त्यातील अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी पूजा समितीचे सचिव आणि उपाध्यक्षांसह 7 जणांना अटक केली आहे. एका चुकीच्या घोषणेमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. कोलकाताच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, उत्तर कोलकाताच्या चोरबागान दुर्गा पूजा मंडपामध्ये झालेल्या दुर्घटनेमागे समोर आलेलं कारण अचानक झालेला पाऊस, गर्दीचे योग्य नियोजन न करू शकणे आणि चुकीची घोषणा हे असू शकते. अधिकाऱ्याच्या मते, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे, स्थानिक लोक आणि साक्षीदारांच्या जबाबावरून असे स्पष्ट होते की, शनिवारी संध्याकाळी मंडपामधील गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवले गेले नाही. त्यामुळे तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.







