कमी पावसामुळे नद्या-विहिरींच्या पाणीपातळीत घट
| पनवेल | प्रतिनिधी |
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. नद्या, तलाव आणि विहिरींमधील पाणीसाठा कमी होत असल्याने ग्रामपंचायतींना आतापासूनच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
पनवेल परिसरात यंदा सुमारे तीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, दरवर्षी सरासरी साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळेही पाण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे, भातशेतीतील दाण्यांच्या वाढीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
ग्रामीण भागातील अनेक गावांना जलजीवन मिशन, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत असून, सार्वजनिक नळांमधून पाणी रस्त्यावर वाहून जाते. तसेच पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला विद्युत मोटारी लावल्यामुळे काही घरांना अधिक पाणी मिळते, तर इतर घरांना अपुरा पुरवठा होतो. परिणामी, गावातील सर्व कुटुंबांना पुरेसे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पाण्याचा अपव्यय रोखणे, अनधिकृत मोटारींचा वापर थांबवणे आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गरजेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पर्यायही विचारात घेता येऊ शकतो. वेळीच उपाययोजना केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होईल.






