1,494 लिटर दूध नष्ट, दही जप्त; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
| पनवेल | प्रतिनिधी |
दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तळोज्यातील तीन प्रकल्पांवर कारवाई केली. उत्पादन प्रक्रियेत स्वच्छता आणि दूध साठवणुकीचे नियम पाळले जात नसल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याने तिन्ही प्रकल्पांचे परवाने निलंबित करण्यात आले.
कारवाईत 1,494 लिटर दूध नष्ट करण्यात आले, तर दही जप्त करण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील तोंडरे गावाजवळील बालाजी औद्योगिक पार्कमधील मातेश्वरी फूड्स, सावरीया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट आणि रॉयल फूड्स या आस्थापनांची एफडीएच्या पथकाने तपासणी केली. सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान मातेश्वरी फूड्समधील 598 लिटर आणि सावरीया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टमधील 896 लिटर दूध नष्ट करण्यात आले. रॉयल फूड्समधील दही जप्त करण्यात आले. दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे यांनी सांगितले.
या प्रकरणी बासदेव मोहन यादव, संजय शंकर यादव, नारायणलाल गणेशलाल दांगी, आशा संजय यादव, राधेश्याम रामकबल यादव आणि संतोष बाबुराव ठाकूर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, साठवणे आणि विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तळोजा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दुधाचे नमुने तपासणीचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसल्याने भेसळीबाबतचा अंतिम निष्कर्ष अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.






