| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
जिल्ह्यात वनविभागाने खैर लाकूड तस्करी विरोधात रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी ही कारवाई आता एका मोठ्या घोटाळ्याच्या भोवऱ्यात सापडली आहे. कागदोपत्री दाखवलेला आकडा आणि प्रत्यक्षात जप्त केलेल्या लाकडाची किंमत यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, संशयित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा येथे 14 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने आंबेद-महाड रस्त्यावर एका वाहनावर धडक कारवाई केली. या कारवाईत खैर सोलिप नग आणि खैर सोलिप किटा जप्त करण्यात आले होते. परंतु, वनविभागाने जारी केलेल्या अधिकृत प्रेस नोटमधील आकडेवारी डोळे दीपवणारी आहे. तब्बल 262 नग खैर लाकूड जप्त करूनही त्याचे मोजमाप केवळ 2.241 घनमीटर दाखवण्यात आले आहे. लाखो रुपयांची बाजारातील किंमत असताना, या संपूर्ण खैराच्या लाकडाची किंमत केवळ 12 हजार 682 रुपये (10,598 + 2,084) एवढी नगण्य दाखवण्यात आली आहे. या संशयास्पद कारभारावर ताशेरे ओढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट सवाल केला आहे की, “बाजारपेठेत खैराच्या लाकडाची विक्री किलोच्या व वाजवी दराने होत असताना, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणातील लाकडाची किंमत केवळ 12 हजार रुपये कशी काय दाखवली? हा सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात फेकलेला धूळफेक असून, याद्वारे बड्या लाकूड तस्करांना पाठीशी घालण्याचा जाणीवपूर्वक आणि संगनमताने प्रयत्न सुरू आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.






