कळंबोलीत हॉकर्स झोनचा जीवघेणा खड्डा; पालिकेच्या कामाच्या खड्ड्यात डासांची पैदास
| कळंबोली | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका हद्दीत महापालिकेच्या माध्यमातून नवीन हॉकर झोन विकसित करण्याचे काम सुरू आहे. कळंबोली सेक्टर-5, केएल-1 येथे देखील हॉकर झोनचे काम सुरू असून, या कामादरम्यान ठेकेदाराकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सुमारे 10 ते 15 फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, त्याच्या भोवती कोणतेही बॅरिकेड, सुरक्षा पट्टी किंवा संरक्षक जाळी लावण्यात आलेली नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
परिसरातून नागरिकांची रहदारी सुरू असते. तसेच परिसरातील लहान मुले या ठिकाणी खेळत असल्याचे दिसून येते. विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने उघडा खड्डा अधिक धोकादायक ठरत आहे. खेळताना अथवा ये-जा करताना एखादे मूल किंवा नागरिक या खड्ड्यात पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराची की महापालिका प्रशासनाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे ही ठेकेदाराची जबाबदारी असतानाच, महापालिका अधिकाऱ्यांनी कामाची वेळोवेळी पाहणी करून सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करणे अपेक्षित आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव दिसून येत असल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, कळंबोलीसह पनवेल महापालिका हद्दीत डेंग्यू आणि मलेरियाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, -1 येथील हॉकर झोनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला डेंग्यू-मलेरियाविरोधात जनजागृती आणि दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या विकासकामाच्या ठिकाणीच पाणी साचून डासांची उत्पत्ती, अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची नाराजी आहे.
तातडीने कारवाईची मागणी
या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी, सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच खड्ड्याभोवती तातडीने बॅरिकेडिंग, संरक्षक जाळी व पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी आणि साचलेले पाणी काढून खड्डा सुरक्षितपणे बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त व महापौर यांनी या गंभीर प्रकाराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा कळंबोलीकरांकडून व्यक्त होत आहे.







