आंबेवाडी ते निवी कालवा दुरूस्ती सुरु
| रोहा | प्रतिनिधी |
गेली कित्येक वर्षे रेंगाळलेल्या आंबेवाडी ते निवी कालव्याची सफाई व दुरुस्ती करून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी उचलून धरत कालव्यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या बळीराजा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या लढ्याला अखेर यश आले असून, कालवा साफसफाई व डागडुजीच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे.
बळीराजा फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, राजेंद्र जाधव, ॲड. दीपक भगत, तुकाराम भगत, महेश कांबळे, शरद जाधव, भूषण मोरे आदी जणांनी नुकतीच पाट बंधारे विभागाचे उप अभियंता सचिन कदम यांची भेट घेऊन कालव्या संदर्भात माहिती दिली. लवकरच कालवा साफसफाई व डागडुजीच्या कामाला सुरुवात करावी. पाण्या अभावी शेती व अन्य लघु उद्योगांना मोठा फटका बसत असल्याची सविस्तर माहिती देत डिसेंबर महिन्यात कालव्याला पाणी सोडण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली. शेतकरी व बळीराजा फाऊंडेशन या संस्थेच्या मागणीकडे कानाडोळा केल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र, याबैठकी नंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली आणि सोमवारपासून कालवा साफसफाई व डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या अनुषंगाने आंबेवाडी जवळील वरसगाव, अशोकनगर हद्दीतील कालव्याला जेसीबी यंत्रेने द्वारे साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कालवा साफसफाई व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. लवकरच काम पूर्ण करून डिसेंबर अखेर पर्यंत कालव्याला पाणी सोडण्यात येईल. तसेच कालवा दुरुस्तीच्या कामामुळे पाण्याची मोठी गळती थांबणार आहे. व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.
सचिन कदम
उप अभियंता पाट बंधारे विभाग कोलाड







