| उरण | प्रतिनिधी |
द्रोणागिरीत टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत; मात्र, या टॉवरच्या उभारणीत कामगारांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले असतील, तर या विकासाचा उपयोग काय? बिल्डरांच्या इमारतींची उंची वाढत असताना कामगारांच्या सुरक्षेची मात्र उंची जमिनीत गाडली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. द्रोणागिरी सेक्टर-47 येथील स्कायलार्क इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टच्या खड्ड्यात पडून विनोद निसाद (40) या कामगाराचा मृत्यू झाल्याने बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा बोजवारा उघड झाला आहे. सोमवारी (दि.19) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेने बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणासह सिडको प्रशासनाच्या देखरेखीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मूळचा उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेला विनोद निसाद हा स्कायलार्क इमारतीच्या बांधकामस्थळी लादी कापण्याचे काम करीत होता. दुसऱ्या मजल्यावर काम करीत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट लिफ्टच्या खड्ड्यात कोसळला. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, तसेच लिफ्टचा खड्डाही सुरक्षित करण्यात आला नव्हता, असे पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी बांधकाम कंत्राटदार निमीशभाई व्होरा याच्याविरोधात उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.







