पिकपाणी नोंदीसाठी शेतकरी आक्रमक
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात सेझ प्रकल्पासाठी जमिनी विकलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जवळपास दोन दशके उलटूनही जमिनींवर प्रकल्प उभा राहिला नाही, त्यातच शासनाने सेझ रद्द केल्याने आता सातबाऱ्यावर पुन्हा आपले नाव लागावे, यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सन 2006-07 च्या सुमारास पेण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सेझ प्रकल्पासाठी आपल्या जमिनी विकल्या होत्या. मात्र, इतकी वर्षे उलटूनही संबंधित जमिनींवर कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी आपल्या जमिनीवरील हक्कासाठी पाठपुरावा करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर रावे येथील शेकडो शेतकऱ्यांनी आज पेण येथील मंडळ अधिकारी कार्यालय गाठत पिकपाणी सदरी शेतकऱ्यांची नावे नोंदविण्याची मागणी केली. यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या अर्ज दाखल केले आहेत. जमिनी विकल्या, प्रकल्पही नाही आणि नोंदीचा प्रश्नही कायम! अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जांवर महसूल प्रशासन काय निर्णय घेते, तसेच सातबारा उताऱ्यावरील नोंदीबाबत कोणती कार्यवाही होते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यावेळी काही शेतकऱ्यांनी ‘कृषीवल’शी संवाद साधत आपली भूमिका मांडली.






