दिबांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक
| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळावे म्हणून प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. उरण मधील दि.बा.पाटील यांच्या जासई या जन्म गावी शनिवारी (दि.24) समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निर्णायक बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये पुढील तीन महिन्यांमध्ये गावागावात जाऊन संपर्क करून एक मोठं जनं उभारले जाईल. हे आंदोलन उग्र स्वरूपाचे असून, विमानतळ बंद पाडले जाणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. तसेच, जोपर्यंत विमानतळ बंद केले जात नाही, तिथे जाणाऱ्या गाड्या रोखल्या जात नाहीत, तोपर्यंत शासन याची दखल घेणार नाही. अनेक वेळेला शासनाने फसवणूक करून आश्वासनांची कोणतीही पूर्तता केली नसल्याचे भूमिपुत्रांनी सांगितले.त्यामुळे विमानतळ बंद पाडणे हेच उद्दिष्ट असून, तशाप्रकारचे नियोजन पुढील दोन ते तीन महिन्यात करून आंदोलनाची हाक दिली जाईल, अशा इशारा सर्वांनुमतेदेण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, नगराध्यक्षा भावना घाणेकर, कामगार नेते भुषण पाटील, उरण समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, राजिप सदस्य डॉ. मनिष पाटील, पंचायत समितीचे सदस्य नरेश घरत, शेकापचे चिटणीस तथा कामगार नेते रवी घरत, सरपंच संतोष घरत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित, रेखा घरत, राजाराम पाटील, नंदकुमार मुंगाजी सह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त, आजी-माजी नगरसेवक, सरपंच-उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.






