। अलिबाग । प्रतिनिधी ।
चिंचोटी येथे महावितरणचा जीर्ण झालेला विजेचा खांब शनिवारी (दि. 24) पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास प्रभाकर धर्मा भांजी यांच्या कौलारू घरावर कोसळला. या दुर्घटनेत घराचे व छतावरील कौलांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पंचमंडळी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर उसर येथील कनिष्ठ अभियंता निखिलेश शेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चिंचोटी विभागाच्या तलाठी दीक्षा कडू आणि चिंचोटी गट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनीही घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गावातील इतर जीर्ण व धोकादायक विजेचे खांब तातडीने बदलण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. आणखी एखादा खांब कोसळून दुर्घटना घडण्याची वाट महावितरण पाहणार का? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन परिसरातील धोकादायक खांब त्वरित बदलण्याची मागणी केली आहे.






