प्रकल्प पूर्ण करण्यास ठेकेदार अपयशी; काशीद- मुंबई रो-रो सेवेची पर्यटकांना प्रतीक्षा
| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |
पर्यटनाला चालना देण्याबरोबरच मुंबई ते मुरूडचा प्रवास कमी वेळेत व्हावा; म्हणून काशीद येथे रो-रो प्रकल्पाचे स्वप्न दाखविण्यात आले. मात्र, काशिदमधील या जेट्टीचा प्रकल्प फेल ठरल्याची बाब समोर आली आहे. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला बंधारा फुटून गेला आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांची काशिद-मुंबई रो-रो सेवा लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या उदासीनतेमुळे स्थानिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
रायगड जिल्ह्यातील काशिद हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी कायमच आकर्षक ठरणार आहे. जगाच्या नकाशात काशिद समुद्र किनाऱ्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. वर्षाला दोन लाखाहून अधिक पर्यटक काशिदमध्ये फिरण्यासाठी येतात. काशिद समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद पर्यटक मनमुरादपणे लुटतात. मुंबई येथून मांडवा त्यानंतर मांडव्यावरून वाहनाने अलिबागमार्गे काशिदला पोहचतात. त्यामुळे पर्यटकांना अलिबागहून काशिदला जाण्यासाठी तीन तास अधिक मोजावे लागतात. प्रवासात वेळ जात असल्याने पर्यटकांना किनारी फिरण्याचा आनंद घेण्यास जास्त वेळ मिळत नाही.
पर्यटकांचा हा त्रास कमी करण्यासाठी मुंबई ते काशिद रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मांडवा ते भाऊचा धक्का या यशस्वी प्रकल्पानंतर केंद्र शासनाने सागरमाला योजनेअंतर्गत मुंबई ते काशिद रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरु केला. 2019 पासून या कामाची हालचाल सुरू झाली. सहा वर्षापासून काशिद समुद्रकिनारी या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. समुद्राच्या लाटा थांबविण्यासाठी ब्रेक वॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, प्रवासी जेटी, टर्मिनल निर्माण करण्याचे काम सुरू केले. 112 कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून, मागील वर्षापर्यंत 99.96 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रेक वॉटर रस्ता, पार्कींगचे काम डिसेंबपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये रोरो जेट्टीसाठी 42 कोटी रुपयांची निविदा काढण्याची हालचाल सुरु झाली होती.
मुंबईहून काशिदला जलवाहतुकीने अवघ्या दोन तासात पोहचता येणार त्यामुळे मुरूडपासून काशिद परिसरातील स्थानिकांनी आणि पर्यटकांना या प्रकल्पाबाबत मोठी आशा निर्माण झाली होती. ही सेवा पर्यटकांसह स्थानिकांसाठी फायदेशीर ठरणार होती. ब्रेक वॉटर बंधाऱ्यासह काही ठिकाणी काँक्रिटीकरण व भरावाचे काम करण्यात आले. सिमेंटचे ठोकळे उभारण्यात आले. मात्र, एममबीचा प्रकल्प फेल ठरल्याचे समोर आले आहे. बांधण्यात आलेल्या बंधारा समुद्राच्या उधाणाने निखळला आहे. दगड, सिमेंट ठोकले सरकले आहेत. त्यामुळे एमएमबी विभागाची मोठी पंचायत झाली आहे. काशिद येथील ब्रेक वॉटर बंधारा, पार्कींग, रस्त्याचे काम पूर्णतः अपूर्ण स्थितीत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
ठेकेदारासह महाराष्ट्र सागरी मंडळाच्या दुर्लक्षपणामुळे व अभ्यासाच्या अभावामुळे अपूर्ण कामाचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. मुंबई ते काशिद रो-रो सेवा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा पर्यटकांना लागून राहिली आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून केली जात आहे.
पुनरावलोकन करण्याची वेळ
मुरुड तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काशिद जेट्टी प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे आणि त्यातील विविध तांत्रिक आव्हानांमुळे आता या प्रकल्पाचे आणि परिसराचे सखोल संशोधन व पुनरावलोकन केले जात आहे. मुंबई ते काशिद दरम्यान थेट जलमार्गाच्या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रकल्पाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होऊ शकले नाही.समुद्रातील भौगोलिक परिस्थिती आणि बांधकामातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी संशोधनात्मक पातळीवर पुनरावलोकन करण्याची वेळ महाराष्ट्र सागरी मंडळावर आली आहे.






