| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.30) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पार पडणार आहे. हा कार्यक्रम अलिबाग नगरपरिषदेच्या पटांगणात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
दि.6 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरूवात होणार असून, काही दिवसांवरच दिवाळी उत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त अलिबागकरांना एका छताखाली सर्व खरेदी करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये खाद्य पदार्थ, दिवाळीचे साहित्य, कपडे, दागीने, अलंकार, घरगूती उत्पादने आणि विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. हा महोत्सव दि.1 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या कालावधीत ग्राहकांना व नागरिकांना दिवाळीची खरेदी महोत्सवाच्या माध्यमातून करण्याची संधी नगरपरिषदेने प्राप्त करून दिली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती डॉ.साक्षी पाटील, उपसभापती ॲड.अश्वीनी ठोसर, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागातील सभापती, नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.






