। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल परिसरातील ग्रामपंचायत दुदंरे हद्दीतील शिवणसई गावात मांडूळ साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच सेव्ह वाइल्ड लाईफ टीम पनवेलच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापाची सुरक्षितपणे सुटका (रेस्क्यू) केली. मांडूळ सापाबाबत समाजात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा प्रचलित आहेत. पैशाचा पाऊस, तांत्रिक गोष्टीसाठी वापरला जातो ही सर्व अंधश्रद्धा आहे. या सापाला विनाकारण मारू नये किंवा त्रास देऊ नये. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. साप आढळल्यास त्याला स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सेव्ह वाइल्ड लाईफ टीम पनवेलच्या वतीने करण्यात आले. वन्यजीव संरक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सेव्ह वाइल्ड लाईफ टीम पनवेल सातत्याने कार्यरत आहे. यावेळी विश्वास पाटील, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दुदंरे, वनरक्षक संभाजी पोळे, वृषाली कोळी, सर्पमित्र तेजस अविनाश उलवेकर, सतीश म्हात्रे, कल्पेश मोहकर, सेव्ह वाइल्ड लाईफ टीम, पनवेल उपस्थित होते.







