बोर्डो मिश्रण वापराबाबतचे दिले प्रात्यक्षिक
। खोपोली । प्रतिनिधी ।
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, आचळोली (ता. महाड) येथील बीएससी कृषी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पेण तालुक्यातील कासू येथे शेतकर्याच्या शेतावर बोर्डो मिश्रण वापराबाबतचे प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषिदूत नितीश म्हात्रे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पिकावर पडणार्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण हे प्रभावी बुरशीनाशक आहे. 1 किलो मोरचुद फडक्यात बांधून ते एका प्लॅस्टिक ड्रममध्ये 50 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवून पूर्ण विरघळू द्यावे. प्लॅस्टिकच्या दुसर्या ड्रममध्ये 1 किलो चुना भिजत ठेवावा. मोरचुदाचे तसेच चुन्याचे द्रावण काठीने ढवळून घ्यावे. ही दोन्ही द्रावणे 100 लिटर क्षमतेच्या तिसर्या ड्रममध्ये एकाचवेळी पण हळूहळू काठीने ढवळत ओतावे. तिसर्या ड्रममध्ये तयार झालेले आकाशी रंगाचे मिश्रण म्हणजेच बोर्डोमिश्रण असे त्यांनी सांगितले.
कृषिदूत संदीप भगवान माने म्हणाले की, नारळ व सुपारीच्या खोडावरील डिंक्या रोग, लिंबावरील देवी रोग, आंब्यावरील पिंक रोग इ.च्या नियंत्रणासाठी बोर्डोपेस्ट वापरतात. रोगट भाग खरवडून किंवा रोगट फांद्या छाटलेल्या जागी बोर्डोपेस्टचा लेप ब्रशने दिल्यास बुरशीजन्य आणि सूक्ष्म जीवांमुळे होणार्या रोगांचे नियंत्रण करता येते असे त्यांनी सोप्या भाषेत समजवून सांगितले.
या प्रात्यक्षिकासाठी कृषिदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जे.गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.व्ही.आर.पवार, कार्यक्रम अधिकारी अ. वि. महाजन, विषयतज्ज्ञ सु.फ.पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी निवडक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.