| चिरनेर | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असताना, रायगड जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश केला असताना, उरण तालुक्याला वगळण्यात आल्याने येथील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने तीव्र निषेध केला आहे.
उरण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी 22 ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी उरण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शासनाच्या नव्या पत्रकातही उरणचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांच्या या दुष्काळी गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देऊन उरणचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा अशी मागणी त्यांनी यावेळी पक्षातर्फे केली आहे.






