जुगारप्रकरणी 7, दारूबंदीसाठी 30 कारवाया
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, मटका जुगार आणि अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मटका जुगाराविरोधात आतापर्यंत सात कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये महेंद्र एकनाथ माहीमकर याच्याकडून 645 रुपयांचा मटका माल जप्त करण्यात आला. तसेच रामराज, खानाव, चौल आणि थेरोंडा परिसरात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये 12 हजार 640 रुपयांपासून ते 29 हजार 700 रुपयांपर्यंतचा मटका माल व मोबाईल जप्त करण्यात आले. मुक्तार युसुफ पटेल आणि गजानन हरिश्चंद्र दिवकर यांच्याकडून 26 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय पत्ता जुगार खेळणाऱ्या पाच जणांविरोधातही कारवाई करून 3 हजार 100 रुपये जप्त करण्यात आले. मटका जुगारासोबतच अवैध गावठी व विदेशी दारू विक्री आणि वाहतुकीविरोधातही पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. आतापर्यंत एकूण 30 कारवाया करण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईत गावठी दारू, विदेशी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, रबरी ट्यूब, ड्रम तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये भालगाव (रोहा) येथील प्रमोद हरिश्चंद्र परडळे याच्याविरोधातील कारवाईत कारसह 8 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सुडकोली येथील दीपक परशुराम म्हात्रे याच्याकडून कारसह 3 लाख 42 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामराज येथील शुभम सुरेश वाघमारे याच्याकडून स्कूटीसह 40 हजार 300 रुपयांचा, तर कुदे येथील बाळू पांडुरंग वाडेकर याच्याकडून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह 37 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय कोकण परिसरातील कुणाल मेघनाथ वाडकर याच्याकडून दुचाकीसह 21 हजार रुपयांचा मुद्देमाल, तर मोरंडे येथील अनंत नारायण पाचंगे याच्याकडून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व टाकीसह 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये गावठी दारूच्या साठ्यांसह विदेशी दारूही जप्त करण्यात आली आहे.




