प्रशांत नाईक मित्र मंडळाने जोडले सामाजिक ऋणानुबंध!
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या शुभेच्छा, प्रेम आणि आपुलकीचे रूपांतर समाजोपयोगी कृतीतून करण्याचा वेगळा पायंडा प्रशांत नाईक मित्र मंडळाने घालून दिला आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि.22) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरातून सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, शिबिरात तब्बल 86 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
प्रशांत नाईक मित्र मंडळाच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या सहकार्याने श्रीबाग येथील कच्छी भवनमध्ये रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येणाऱ्या मित्रपरिवाराने यावेळी केवळ औपचारिक शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता रक्तदानासारख्या जीवनोपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत रक्तदानासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमात मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रांतील नागरिकांनीही सहभाग नोंदवला. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त एका व्यक्तीपुरते किंवा मित्रपरिवारापुरते मर्यादित न राहता सामूहिक सामाजिक सहभागाचे व्यासपीठ बनले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तपेढीत उपलब्ध होणारा प्रत्येक रक्तसाठा महत्त्वाचा असतो. याच जाणिवेतून आयोजित या शिबिराने रक्तदानाविषयीची सामाजिक जाणीव अधोरेखित केली.

यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी मात्रे, नगरसेविका अश्विनी ठोसर, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, साक्षी पाटील, नीलम हजारे, ऋषिकेश माळी, संतोष गुरव, योजना पाटील, निवेदिता वाघमारे, शैला भगत, वृषाली भगत, सुषमा पाटील, संध्या पालवणकर, सागर भगत, अनिल चोपडा, समीर ठाकूर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रवी थोरात, संजय कांबळे, कपिल अनुभवणे, मुसद्दीक चौधरी, प्रकाश राठोड, सागर पेरेकर, राकेश म्हात्रे, डॉक्टर दीपक गोसावी यांच्यासह टीमने विशेष परिश्रम घेतले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने आणि मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समन्वयातून शिबिराचे आयोजन यशस्वी झाले.
या उपक्रमातून वाढदिवस हा व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो; मात्र, त्या आनंदात समाजालाही सहभागी करून घेतले, तर त्यातून निर्माण होणारे ऋणानुबंध अधिक अर्थपूर्ण ठरतात. शुभेच्छांच्या माध्यमातून मिळणारे प्रेम रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून समाजाला परत देण्याचा संदेश प्रशांत नाईक मित्र मंडळाने दिला.





