| रोहा | प्रतिनिधी |
दिल्ली येथे रविवारी (दि.1) इंडिया आघाडीच्यावतीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचे आयोजन विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेले रोहा तालुकाध्यक्ष मितेश कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी रोह्यातील एसटी स्थानक परिसरात आंदोलन करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर आक्षेप नोंदवण्यात आला. तसेच, जाणिवपूर्वक मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत पक्षाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकांचा महत्त्वपूर्ण हक्क असून, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता कायम राहावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची तसेच निवडणूक प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशफाक पानसरे यांनी केली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशफाक पानसरे, सरचिटणीस सुनील देशमुख, खजिनदार रामप्रकाश कुशवाह, अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष फैसल अधिकारी, सगीर अधिकारी, बशीर भुरे, अशोक कांबळे, हरीओम टाळकुठे, खुर्शीद अधिकारी, नावेद चौगुले, इकबाल पानसरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






