मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तीन तास पावसाचा धुमाकूळ; कापून ठेवलेली भातशेती पाण्याखाली
| रोहा | प्रतिनिधी |
आधी पावसाने फिरवलेली पाठ आणि आता ऐन भातकापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतात कापून ठेवलेली भातशेती पूर्णपणे भिजून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला आहे. या संकटामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे.
ऑगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने सारेजण उकाड्याने हैराण झाले होते. पाऊस अचानक गायब झाल्याने रायगडकरांवर जणुकाही जलसंकट कोसळल्याचे चित्र सर्वत्र होते. मात्र, सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कित्येक दिवस बेपत्ता झालेल्या पावसाने अचानक धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतात कापून ठेवलेली भातशेती पूर्णपणे भिजून गेली असून, काही ठिकाणी शेतात फूट ते दीड फूट पाणी साचले आहे. भातशेतीबरोबरच ग्रामीण भागातील वीटभट्टी व्यवसायालाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
रोहा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटनेकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे पीक उद्ध्वस्त होत असताना आमदार, खासदार बघ्याची भूमिका घेत आहेत, याचे आश्चर्य वाटते. सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात फूट ते दीड फूट पाणी साचून शेती पूर्णपणे बरबाद झाली. हे चित्र पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले आहे. मात्र, लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात मश्गूल आहेत, अशी टीका बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव यांनी केली.






