| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे दस्तुरी येथील वाहनतळावर वाहने उभी करावी लागतात. मात्र, येथील वन विभागाचे वाहनतळ अपुरे पडत असल्याने शासनाने एक भूखंड वाहनतळ उभारण्यासाठी दिला आहे. मात्र, त्या वाहनतळावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे ते अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेने केली आहे.
माथेरानमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या वाहनांसाठी दस्तुरी येथे वाहनतळ आहे. शहरात वाहनांना बंदी असल्याने तेथेच वाहने उभी करावी लागतात. मात्र, पर्यटन हंगामात हे वाहनतळ पुर्णपणे भरत असल्यामुळे पर्यटकांना ताटकळत रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने याच वाहनतळ जवळील एमपी प्लॉट 93 हा भूखंड वाहनतळ उभारण्यासाठी माथेरान नगरपरिषदेला दिला आहे. मात्र, या भूखंडावर मोठ्या प्रमाणात घोड्यांचे तबेले असल्याने ते अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी मागणी माथेरान मधील श्रमिक रिक्षा संघटनेने केली आहे. त्याचवेळी संघटनेने दिलेल्या निवेदनात माथेरान शहरात 250 घोड्यांना परवानगी असल्याने तेवढेच घोडे ठेवण्यात यावेत. तसेच, माथेरानमधील मुख्य बाजारपेठेतील टपालपेटी ते वाचनालय या भागात घोडे नेण्यास बंदी असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी माथेरान नगरपरिषदेने करावी, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार आणि सचिव सुनील शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.






