नगरपरिषदेकडून कागदपत्रे सादर करण्याची नोटीस; नियमबाह्य बांधकाम आढळल्यास कारवाईचा इशारा
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील अप्सरा हॉटेलच्या इमारतीच्या बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या बांधकामाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत महाड नगरपरिषदेने संबंधितांना नोटीस बजावली आहे. बांधकामाची वैधता तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 15 दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमबाह्य बांधकाम आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे.
महाड येथील सर्व्हे क्रमांक 2322 मधील मालमत्तेवर नवीन, पक्के अथवा कच्चे बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या अप्सरा हॉटेलच्या इमारतीच्या बांधकामाबाबत महाड नगरपरिषदेने आता कडक भूमिका घेतली आहे. महाड शहरातील या इमारतीमध्ये नवीन अथवा पक्के बांधकाम करण्यात आले असल्याबाबत, तसेच संबंधित बांधकामाची वैधता तपासण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेने संबंधितांना अधिकृत नोटीस बजावली आहे. महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून दि.26 ऑक्टोबर रोजी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या बांधकामाची वैधता तपासण्यासाठी नगरपरिषदेने संबंधितांकडे 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये नगरपरिषदेची बांधकाम परवानगी किंवा ना-हरकत दाखला, भोगवटा प्रमाणपत्र व मंजूर बांधकाम नकाशा, प्रॉपर्टी कार्ड अथवा 7/12 उतारा, सिटी सर्व्हेचा नकाशा तसेच महसूल खात्याचे विनंती आदेश व नकाशा इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. निर्धारित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास किंवा बांधकाम नियमबाह्य असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकाम बंद करण्यासह ते काढून टाकण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, कायद्यानुसार पुढील कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे. त्यामुळे अप्सरा हॉटेलच्या बांधकामाबाबत नगरपरिषद आता नेमकी कोणती भूमिका घेते, संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे सादर होतात का आणि बांधकामाच्या प्रत्यक्ष तपासणीत काय निष्पन्न होते, याकडे महाडकरांचे लक्ष लागले आहे.






