। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल परिसरात भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या अज्ञात कारचालकाने दुचाकीला धडक देऊन अपघात केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात दुचाकीवरील महिलेच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमी महिलेला कोणतीही वैद्यकीय मदत न करता कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय गोविंद सुर्वाडे (58) रा. श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नवीन पनवेल हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी नवीन पनवेल ब्रिजजवळील चौकामध्ये अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवले. कारने त्यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील प्रिया विनय सुर्वाडे (44) यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, अपघात घडल्यानंतर कारचालकाने जखमी महिलेला कोणतीही वैद्यकीय मदत केली नाही किंवा पोलिसांना अपघाताची माहिती दिली नाही. उलट तो घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी विनय सुर्वाडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील करीत आहेत.






