| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा फेज 1, 2 आणि खारघर परिसरातील गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगने सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नावर नागरिकांना दिलासा मिळावा, या मागणीसाठी महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड भवन येथे सिडकोच्या जलविभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेचा जाब विचारला. यावेळी सात दिवसांचा अल्टिमेटम देत पाणीपुरवठ्यात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या बैठकीला सिडकोचे अधीक्षक अभियंता नानिक चोतानी आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता चेतन बुध उपस्थित होते. तळोजा आणि खारघर परिसरात नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे आणि अनियमित वेळापत्रक अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. सिडको प्रशासनाकडून 15 ते 30 टक्के पाणी कपात होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना 50 टक्क्यांहून अधिक पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे कागदोपत्री आकडेवारीऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने महिला, गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. शुक्रवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करून पाणीपुरवठा बंदचा दिवस अन्य दिवशी निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शुक्रवारचा शटडाऊन रद्द करून तो अन्य दिवशी हलविण्याचे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी दिल्याचे महिला विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.






