ग्रामस्थांचा प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
नदीपात्रात कथित अनधिकृत बांधकामे, उत्खनन आणि वॉल कंपाउंड उभारण्याचे प्रकार सुरू असताना महसूल आणि पाटबंधारे विभाग मात्र जबाबदारी झटकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाशी छेडछाड झाल्यास गावांवर पुराचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करत आरडेचीवाडी (हेदवळी), कानसळ आणि दहिगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संबंधित विभागांनी 15 दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.
परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन, बांधकामे आणि नदीकाठाला वॉल कंपाऊंड उभारले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होऊन अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. याबाबत पाटबंधारे विभागाकडे विचारणा केली असता महसूल विभागाकडे, तर तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे दाद मागितली असता पाटबंधारे विभागाकडे बोट दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
हेदवळी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जोरकर यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे. तहसीलदारांना निवेदन देण्यासह पाटबंधारे विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. नदीपात्राची अधिकृत हद्द निश्चित करावी, उत्खननाच्या परवानग्यांची तपासणी करावी आणि कथित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 15 दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत, तर नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना एकत्र करून व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.






