शिलार धरण प्रकल्प रद्द करण्यासाठी थोपटले दंड
| नेरळ | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आता स्वपक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील शिलार धरण आणि टोरेंटच्या ऊर्जा प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचा आरोप करत भाजपचे कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून शिलार धरण प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. पक्षापेक्षा आधी मी या मातीचा पुत्र आहे, अशी ठाम भूमिका घेत रसाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात दंड थोपटल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे.
भाजपचे कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून शिलार-पोशीर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पांवर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हेच भाजपचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती आणि समृद्ध पर्यावरणाचा नाश होत असेल, तर त्याला विरोध करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. मी विकासाच्या विरोधात नाही, तर सरकारने निवडलेल्या चुकीच्या जागेच्या विरोधात आहे, असे रसाळ यांनी स्पष्ट केले.
भीमाशंकर अभयारण्याच्या जवळ असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये शेकरू, बिबट्या, रानडुक्कर, उदमांजर यांसह दोनशेहून अधिक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. झाडांच्या कत्तलीमुळे पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले नष्ट होऊन संपूर्ण अन्नसाखळीवर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
टोरेंटसारखा तीन हजार मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारायचाच असेल, तर त्यासाठी सह्याद्रीचीच निवड का, असा सवाल रसाळ यांनी उपस्थित केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात मोठ्या प्रमाणावर पडीक, नापीक आणि बंजर जमीन उपलब्ध असताना तेथे सौरऊर्जा आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्प उभारता येऊ शकतात. अशा पर्यायी जागांचा विचार केल्यास वृक्षतोड टाळता येईल आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल, असे त्यांनी सुचवले आहे. सरकार कोळसा वाचवण्याच्या नावाखाली ऑक्सिजन निर्माण करणारी नैसर्गिक संपत्तीच नष्ट करत असल्याची टीकाही त्यांनी केली. तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी असे सुनावत सरकारने प्रकल्पाची जागा बदलावी, सह्याद्री आणि कर्जत वाचवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कर्जत तालुक्यात आधीच विविध प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारत असून, कोंढाणे धरणाची जलवाहिनी, टोरेंटची वीज साठवणूक व पुरवठ्यासाठीची उच्चदाब विद्युत वाहिनी, टाटा पॉवरची वाढीव वीजपुरवठा वाहिनी तसेच पोशीर धरणाच्या जलवाहिन्या आणि विद्युत वाहिन्यांमुळे तालुक्याचे अक्षरशः तुकडे होतील, अशी भीती रसाळ यांनी व्यक्त केली आहे. या वाहिन्यांच्या मार्गात येणारी झाडे मुळासकट तोडली जातील. उच्चदाब वाहिन्यांखाली भविष्यात वृक्षलागवडीवरही मर्यादा येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर हिरवाई नष्ट होईल. सर्वत्र उभे राहणारे टॉवर, खोदलेले रस्ते आणि जलवाहिन्यांसाठीची खोदाई यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य कर्जत तालुका विद्रूप होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून, कर्जतच्या मातीच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा आहे. सरकारने वेळीच जागे व्हावे आणि शिलार धरण प्रकल्प रद्द करून पर्यावरणाचा विनाश थांबवावा, अशी ठाम मागणी रसाळ यांनी केली आहे.







